गाव: घारापुरी | तालुका: उरण | जिल्हा: रायगड
घारापुरी हे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील ऐतिहासिक व निसर्गरम्य गाव आहे. येथे प्राचीन लेण्यांचे शहर असून, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपला जातो. गावात स्वच्छता, पाणीपुरवठा आणि शिक्षण या क्षेत्रातही प्रगती झाली आहे.
सप्रेम नमस्कार ! घारापुरी (एलिफंटा) हे जागतिक किर्तीचा वारसा लाभलेले पर्यटनक्षेत्र असून "अ" दर्जाचे तिर्थक्षेत्र आहे. मात्र, मुबंईपासून हाकेच्या अंतरावर असलेले घारापुरी हे बेट सोयी-सुविधांपासुन वंचित राहिलेले आहे. त्यासाठी बेटावर येणाऱ्या पर्यटकांना व येथील ग्रामस्थांना मुळभुत सुविधा मिळाव्यात म्हणुन ग्रामपंचायत प्रयत्नशिल आहे. अशा या जागतिक किर्तीचा वारसा लाभलेल्या बेटाविषयी संक्षिप्त माहीती आपणापुढे सादर करीत आहोत. (सदरची माहीती घारापुरी बाबतीत उपलब्ध असलेल्या पुस्तकामधून घेतलेली आहे) . त्याप्रमाणे आपण निसर्गरम्य घारापुरी बेटावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अवश्य यावे हि नम्र विनंती.आपला नम्र श्री.बळीराम पद्माकर ठाकुर उपसरपंच, ग्रामपंचायत घारापुरी
घारापुरी लेण्यांमधील जगप्रसिध्द महेशमुर्ती.. घारापुरी-एलिफंटा लेणी, थोडक्यात माहीती.... घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा गुंफा मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर म्हणजे साधारण ११ कि.मी. समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात आहेत. ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३०० च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे.
१९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापुरी-राजबंदर गावाच्या डोंगरावर प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. त्यावरुनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे (जीजामाता उद्यान-मुबंई). (१९०५ सालचे छायाचित्र व लेण्यांचा आराखडा) .
एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केली याला कुठेच तोड नाही. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केल्यानी सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले.
परंतु या गुफां संबंधित जाणकारांची वेगवेगळी मत पाहायला मिळतात. काही इतिहासतज्ञांच्या मते कोंकण मौर्यांनी या एलिफंटा गुंफांची निर्मिती केली होती. तर काही तज्ञांच्या मते राष्ट्रकुट आणि चालुक्यांना या गुफांचे श्रेय दिले जाते. पोर्तुगीजांशी देखील या गुंफांचा इतिहास जोडला गेला आहे. १६ व्या शतकात येथे पोर्तुगीजांची सत्ता होती. व इथल्या विशालकाय हत्तीच्या प्रतिमेमुळे पोर्तुगीजांनी या गुंफांना एलिफंटा असे नाव दिले होते. या वेगवेगळ्या मत-मतांतरामुळे या प्रसिद्ध गुंफांचा इतिहास स्पष्ट आढळत नाही.
महत्त्व आणि वैशिष्ट्ये.. या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात.
भौगोलिक स्थिती.. एलिफंटा बेट किंवा घारापुरी, दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळच्या खाडीमधील एक बेट आहे. बेटाच्या पुर्वेस जेएनपीटी प्रकल्प, पश्चिमेला बुचर आयलंड (मुबंई), दक्षिणेस एन.ए.डी. (नेव्ही) उत्तरेस भाभा अनुशक्ती केंद्र अशी भौगेलिक स्थिती आहे. घारापुरी बेटाच्या डोंगरावर अती प्राचीन दोन महाकाय तोफा (कॅनोन) असुन सदरचे ठिकाणाहून संपुर्ण मुबंई व नवी मुबंई परिसर न्याहाळता येतो.
बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस कि.मी. आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किमी असते. घारापुरी बेटावर राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर अशी सोन पदी-शेपटी गावे आहेत. घारापुरीच्या लेणीकाठचा समुद्र घारापुरीच्या लेण्यांमधील त्रिमूर्तीचे शिल्प
प्रवास.. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून बोटीने जावे लागते. बोटीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रुपही न्याहाळता येते. शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्राला सामुग्री पोहोचविणारे न्हावा बेस (ओएनजीसी), जेएनपीटी अर्थात न्हावाशेवा बंदर, देशविदेशांतील मोठ-मोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय. (मात्र अन्नपदार्थ सी-गल किंवा अन्य पक्षांना खायला देण्यास मनाई असुन हा दंडणीय अपराध सुध्दा आहे याचे भान असायला हवे) .
मुख्य गुहा.. मुख्य गुहा अथवा शिव गुहा/ गुहा १ किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती २७ मीटर (८९ फूट) वर्गचा मंडप आहे. या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या संयुक्त मूतीला त्रिमूर्ती असे म्हणतात.
रावणानुग्रह.. एका लेण्यात, कैलास पर्वतावर शिव-पार्वती बसलेली असून, रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे असे दृश्य दिसते. शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्याच्या मुद्रेवर शांत, निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे. शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.
रावणानुग्रह शिव पार्वती विवाह
विवाह मंडल.. हे घारापुरी लेण्यामधील शिल्पातील सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल. शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली. तिला मागणी घालण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले. हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला. यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले, हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.
इतर उल्लेखनीय गुंफा.. इतर ठिकाणी मानवती पार्वती, गंगा अवतरण, शिवशक्ती, अर्धनारी-नटेश्वर, महायोगी शिव, ल्कुलीह्ह्माची मूर्ती, भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात. एलिफंटा गुंफांना भेट द्यायला कसे याल ? - How to reach Elephanta Caves मुंबई पासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या एलिफंटा गुंफांना जाण्याकरता पर्यटकांना गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचावे लागेल. तेथुन बोटीतुन एलिफंटा बेटावर जाता येते. विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज एयरपोर्टला उतरून खाजगी वाहनाने गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचावे लागेल. तेथुन बोटीतुन एलिफंटा गुंफा येथे पोहोचता येते. मुंबई विमानतळापासून हे अंतर २८ कि.मी. चे आहे.
मुंबई रेल्वे मार्गाने देखील उत्तम रीतीने जोडले असल्याने आपण रेल्वेने सी.एस.टी. किंवा चर्चगेट-मुंबईला येऊन एलिफंटा गुंफा पहायला जाऊ शकतात. तसेच नवी मुबंई येथील बेलापुर, न्हावा, मोरा-उरण येथुन नियोजन करुन एलिफंटा गुंफा पहायला पोहोचता येतं.
घारापुरी ग्रामपंचायत आणि कर्तव्यः एलिफंटा-घारापुरी हे जागतिक किर्तीचा (युनेस्को) वारसा लाभलेले पर्यटनक्षेत्र असुन चोहोबाजुने समुद्राच्या पाण्याने वेढलेले बेट आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील "अ" दर्जाचे तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे सदरचे ग्रामपंचायतीला फार मोठे महत्व प्राप्त आहे.
मात्र ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न फारच कमी असल्याने इच्छा असुनही काहीही करता येत नाही. तसेच घारापुरी बेटावर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वनविभाग, भारतीय पुरातन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल, भारत पर्यटन (आयटीडीसी) आदी विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे सदरच्या विभागाअंतर्गत बेटावरील विकास कामे करण्याचे मोठे आव्हान ग्रामपंचायतीपुढे आहे. मात्र ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच श्री. बळीराम पद्माकर ठाकुर व त्यांचे सहकारी विकास कामांसाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याने व शासनाकडुन सहकार्य मिळत असल्याने बेटाचा लवकरात लवकर कायापालट होईल यांत तिळमात्र शंका नाही.
गाव-पाडे वस्तीः घारापुरी बेटावर राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर अशी तीन लहान-लहान गावे (पाडे) आहेत. तीनही गावांची एकुण लोकसंख्या ११०० एवढी आहे. तसेच तीनही गावातील कुटुंब संख्या २७० एवढी आहे.
राजबंदरः घारापुरी बेटावरील तिन्ही गावापैकी जास्त कुटुंब व लोकसंख्या असलेले गाव. राजबंदर येथील साधारणपणे १२० कुटुंब संख्या आहे. मराठी शाळा व मतदानकेंद्र येथे असल्याने मोराबंदर व शेतबंदर येथील ग्रामस्थांना राजबंदर येथे यावे लागते. मोराबंदर गावापासुनचे राजबंदर गावाकडे येण्यासाठी तीन किलोमिटरचे अंतर पार करावे लागते. तसेच शेतबंदर येथुन राजबंदरकडे येण्यासाठी साधारणपणे दोन किलोमिटर अंतर आहे.
शेतबंदरः गेटवे ऑफ इंडिया वरुन बोटीने येणारे पर्यटक शेतबंदर येथुनच येत असतात. त्यामुळे शेतबंदर येथे पर्यटक जेटी असल्याने या गावाचे महत्व अधिक आहे. शिवाय एलिफंटा लेण्यांकडे येथुनच मार्ग असल्याने शेतबंदर हे बेटावरील व्यवसायासाठी माहेर घर आहे असे बोलले तर वावगे ठरणार नाही. शेतबंदर येथील कुटंब संख्या ९५ एवढी आहे.
मोराबंदरः वरिल दोन्ही गावापेक्षा मोराबंदर हे गाव लहान असुन येथील कुटुंबसंख्या ५५ एवढी आहे. मोराबंदर हे गाव राजबंदर व शेतबंदर गावापासुन तसेच लेण्यांपासुन तीन ते साडेतीन कि.मी. एवढे लांब असुन डोंगराच्या आडोशाला असल्याने मोराबंदर गावाकडे कोणाची नजर जात नाही.
पाण्याचे स्तोत्रः घारापुरी बेटावर एक धरण असुन धरणाचे अंदाजे क्षेत्रफळ ५ एकर एवढे आहे. सदरच्या धरणाची पाणी साठवण क्षमता १०,००,००० लिटर एवढी आहे. सदरच्या धरणातील पाणी ग्रामपंचायतीमार्फत बेटावर येणा-या पर्यटकांना व ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरविले जाते. मात्र सदरचे धरण मोठ्या प्रमाणात लिकेज (गळती) असल्याने फेब्रुवारी महिन्याअखेर सदरचे धरण कोरडे होते. त्यामुळे बेटावर पाणी टंचाई निर्माण होते. यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्नांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आराखडा तयार करण्यात आला आहे. सदरचे कामासाठी अंदाजे ५ कोटी पेक्षा अधिक खर्च येणार आहे. त्याप्रमाणे सदरचे कामासाठी लागणारा निधी उपलब्ध झाल्यास सदरचे काम होऊन पाणी टंचाई कायमची संपुष्टात येईल. घारापुरी बेटावर सन २०१८ पासुन कायमस्वरुपी वीज सुरु झाल्याने येथील ग्रामस्थ सुखावले आहेत. त्यामुळे बेटावरचा पाणी प्रश्न मार्गी लागल्यास बेटावर येणा-या पर्यटकांना व येथील ग्रामस्थांना दिलासा मिळेल.
विहिरीः घारापुरी येथे राजबंदर गावात ३ विहिरी, शेतबंदर गावात २ विहिरी, तसेच मोराबंदर येथे ३ विहीरी आहेत. त्यामध्ये मोराबंदर येथील शिवकालीन विहिरीला (हाद) मंगळटाका म्हणुन संबोधतात. मात्र राजबंदर व मोराबंदर येथील शिवकालीन मंगळटाका (हाद) विहीर वगळता इतर विहिरींमधील पाणी मार्च एप्रिल मध्येच संपुष्टात येते. ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे साधनः बेटावर येणा-या पर्यटकांपसून मिळणारे वार्षिक पर्यटक कर हेच ग्रामपंचायतीचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. मात्र बेटावर येणा-या पर्यटकांना व येथील ग्रामस्थांना सेवा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला मोठा खर्च येत असल्याने इतर विकासकामे करण्यास निधी अपुरा पडतो. त्यामुळे बेटावर येणा-या पर्यटकांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांची ओरड असते.
ग्रामपंचायत विषयीः घारापुरी ग्रामपंचायत १९ मार्च १९६१ रोजी अस्तित्वात आली. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ७ एवढी आहे. मात्र सन २०१७ चे शासन आदेशाप्रमाणे सरपंच पदासाठी थेट जनतेतुन निवड झाल्याने श्री.बळीराम पद्माकर ठाकुर हे थेट सरपंच निवडुन आल्याने सन २०१७ ते २०२२ करीता ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ८ एवढी आहे. तसेच बेटावर २२ फेब्रुवारी २०१८ पासुन कायमस्वरुपी वीज आल्याने आणि ग्रामपंचायतीमार्फत सन २०१७ पासुन खऱ्या अर्थाने विकास कामे सुरु झाल्याने घारापुरीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. याआधी बेटाकडे अती दुर्गम भाग म्हणुन पाहीले जात होते. मात्र ग्रामपंचायतीकडुन राबविलेली विकासकामे पाहुन व भविष्यात होणारी विकासकामे पाहुन सर्वांनाच याचे आश्चर्य वाटत आहे.
शाळाः घारापुरी बेटावर रा.जि.प.मराठी ची इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत मराठी शाळा आहे. मात्र मुलांची पटसंख्या घटलेली असल्याने येथील शाळा बंद होईल कि काय? अशी शंका निर्माण हात आहे. माध्यमिक शाळाः काकण एज्युकेशन संस्थेची इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत माध्यमिक शाळा होती. मात्र विद्यार्थ्याची पटसंख्या नसल्याने सन २०२०-२१ रोजी पासुन सदरची माध्यमिक शाळा बंद करण्यात आली आहे.
महिला बचत गटः घारापुरी येथे नोंदणीकृत ३ व अनोंदणीकृत ३ असे एकुण ६ महिलाबचतगट आहेत.
हे आवश्यक आहेः पर्यटक करात वाढ करणे. पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे. ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न वाढविण्यासाठी निर-निराळे उपक्रम राबविल्यास येथील बेरोजगारी कमी होईल व ग्रा.पं.चे स्वउत्पन्नात वाढ होईल. बेटावर गार्डन अथवा पार्क विकसित करुन पर्यटकांना लेण्या पाहुन झाल्यावर पर्यटनासाठी दुसरा पर्याय उपलब्ध करणे.
बेटावरील वाढत असलेली माकडांची संख्या पहाता सदरची माकडे अन्य एखाद्या ठिकाणी हलविणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीचे प्रयत्नांमुळे बेटावर रायगड जिल्हा परिषदेचे अंतर्गत आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले आहे. सदरचे आरोग्य उपकेंद्रात नर्स किंवा डॉक्टर यांची कायमस्वरुपी करणे आवश्यक आहे. घारापुरी हे चोहोबाजुने समुद्राने वेढलेले बेट असल्याने येथील ग्रामस्थांचे दळण-वळण समुद्रातुन बोटीने चालते. परंतु जेएनपीटी तसेच अंतर्गत वाढीव बंदराच्या सागरी वहातुकीमुळे घारापुरी वासीयांचे दळण-वळण धोकेदायक ठरत आहे. यासाठी घारापुरी ग्रामस्थांचे दळण-वळण सुखकर व्हावे म्हणुन उपाय योजना करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल यांनी बनविलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरु झाल्यास ग्रामपंचायतीचे हाती प्रकल्प येणार असल्याने ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे बेटावर येणा-या पर्यटकांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होईल आणि बेटाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मात्र घारापुरी बेटाच्या सर्वांगिन विकासासाठी बेटावर कार्यरत असलेल्या सर्व विभागांनी याकडे लक्ष केंद्रित करुन विकास कामांवर भर दिला पाहीजे.
धन्यवाद! आपले नम्र उपसरपंच श्री.बळीराम पद्माकर ठाकुर सरपंच सौ.मीना मुकेश भोईर सर्व सन्माननिय सदस्य व सदस्या ग्रामपंचायत घारापुरी.